मुंबई – राज्यातील नव्या सरकारने आज आपले बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. या पदासाठी विविध नेत्यांची नावे चर्चेत होती. पण या चर्चेला फार वाव न देता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अजित पवार यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
त्यांच्याकडून आता सरकारच्या संबंधात अधिक चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. या आधी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडूनच शिवसेनेची कोंडी केली जात होती व त्यांना पुरेसा आर्थिक निधी दिला जात नव्हता अशी तक्रार करण्यात येत होती.
त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इन्कार करण्यात आला असला तरी हा एक मोठा ठपका त्यांच्यावर ठेवला जात होता. बदलत्या राजकीय स्थितीत नवीन नेतृत्वाला वाव देण्यासाठी राष्ट्रवादी कडून या पदासाठी अनपेक्षित नाव पुढे केले जाईल अशी अपेक्षा होती. पण त्या पक्षाने आपल्या पारंपारीक नेतृत्वावरच ही जबाबदारी सोपवली आहे.