खटाव (प्रतिनिधी) – लडाखमध्ये देशसेवा करत असताना निधन झालेले खटाव येथील जवान सूरज प्रताप शेळके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. “भारतमाता की जय’, “वीर जवान अमर रहे’च्या जयघोषात सूरज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. अत्यंत शोकाकुल वातावरणात जवान सूरज शेळके यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
खटाव (ता. खटाव) येथील जवान सूरज शेळके यांचे लेह-लडाख येथे कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते. त्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. खटावकरांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवले होते. ग्रामस्थांना जवान सूरज शेळके त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा होती. त्यांचे पार्थिव लेह येथून लष्करी विमानाने पुण्या आणण्यात आले. तेथून सैन्यदलाच्या वाहनातून त्यांचे पार्थिव मूळ गावी खटाव येथे आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांचे पार्थिव काही वेळ त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून जवान सूरज शेळके यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला जात होता. जवान सूरज शेळके यांना श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स ठिकठिकाणी लावण्यात आले होती.
अंत्ययात्रा सुरू असताना “भारतमाता की जय’, “वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, सपोनि संदीप शितोळे, यांनी जवान सूरज शेळके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सातारा पोलीस दल व सैन्यदलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वडील प्रताप व बंधू गणेश यांनी जवान सूरज शेळके यांच्या चितेला भडाग्नी दिला.
अल्पवयात निधनाने अनेकांना दु:खावेग
जवान सूरज शेळके यांचे पार्थिव खटाव येथे येण्यास शनिवारी रात्री उशीर झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक पार्थिवावर पुष्पवृष्टी करत होते. अंत्यसंस्कार करण्यास रात्रीचे दोन वाजून गेले, तरी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जवान सूरज यांचे अल्पवयात निधन झाल्याने अनेकांना दु:खावेग आवरत नव्हता.
सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी सदस्य अशोक कुदळे, राहुल पाटील, डॉ अरुणा बर्गे, नायब तहसीलदार रविराज जाधव, सैनिक फेडरेशनच्या उर्मिला पवार, विद्या बर्गे, राजश्री खंडाळे, शालन कणसे, जयहिंद फौंडेशनच्या हेमलता फडतरे, प्रेमचंद जगताप, कॅ. बबन धुमाळ, कॅ. बबन घाडगे, अमीन आगा, किशोर डंगारे, मंडलाधिकारी मोहन मोहिते, ग्रामसेवक विकास चव्हाण, विस्तार अधिकारी माधव भुईनवाड, पोलीस उपनिरीक्षक हरीश डांगे, कमांडिंग ऑफिसर सिपेंदर सिंग, हवालदार गोरे, सुभेदार दीपक शिंदे, स्टेशन कमांडर संदीप बानगुडे, हवालदार जयवंत घाडगे, दीपक शिंदे यांनी जवान सूरज शेळके यांनी आदरांजली वाहिली. आ. महेश शिंदे यांनी शोकसंदेश पाठवला.