नागपूर: राज्यसभा निवडणुकीच्यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला. त्यावेळी आघाडी सरकारच्या अपयशाचे खापर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अपक्षांवर टाकली आणि काही आमदारांची नावं घेत त्यांनाच दोषी मानले. या आमदारांमध्ये मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील समावेश होता. दरम्यान आता विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा मतदानाचा मुद्दा समोर येणार असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी आपली भूमिका स्प्ष्ट केली आहे.
देवेंद्र भुयार नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी,“काँग्रेसकडून संपर्क झालेला नाही. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे,” अशी स्पष्टोक्ती देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, “संजय राऊत यांनी अपक्षांवर आरोप केल्याने गैरसमज झाला होता. त्यामुळे सर्व अपक्ष नाराज होते. अजूनही त्यांचा आमच्यावर अविश्वास असेल, तर इलाज नाही. संजय राऊत यांनी माझ्या पक्षाला मतदान करु नको, असे सांगितले तरी मी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. हे राज्यसभेच्या वेळी सांगितले होते, आताही तेच कारणार आहे.”
“भाजपने मला संपर्क केला नाही. मी अजित पवार यांच्यासोबत आहे याची त्यांना कल्पना आहे. इतर अपक्षही आघाडीच्या संपर्कात आहेत. मी आताही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला आहे, पण अजूनही दिलेला नाही,” असे आमदार भुयार यांनी यावेळी म्हटले.