नाशिक – आठ वर्षीय बालकाने हिमालय पर्वत रांगेतील अन्नपूर्णा सर्कीट ट्रेक पूर्ण केला आहे. अबीर मोरे असे या चिमुकल्याचे नाव आहे. अबीर व त्याच्या टीमने 18 मे रोजी या ट्रेकला सुरूवात केली होती. रोज 10-12 किमी चालत त्यांनी धारापानी येथे नेपाळ सरकारकडून ट्रेकची परवानगी घेऊन मलांग, याक खाकरा, लेदर असा खडतर प्रवास केला. त्यानंतर 22 मे ला थोरांग हाय कॅंप गाठले.
23 मेला शेवटची समिटची चढाई सूरू केली. या चढाईच्या वेळी बर्फवृष्टी, झोबणारे वारे, विरळ होत जाणारा ॲाक्सिजन व भुस्खलनाच्या बाजुने जाणाऱ्या निमुळत्या वाटा या सर्व गोष्टींना न घाबरता त्यांनी साडेसहा तासात सर्वात उंच भाग म्हणजे थोरांग पास केला. थोरांग हा अवघड चढा पार केल्यानंतर ते मुक्तिनाथ या ठिकाणी ते आले. अन्नपूर्णा शिखर पार केले. नाशिकचे ट्रेकर्स रमेश वाघ, प्रशांत बच्छाव, नंदिनी दुबे व आनंदिता बरूआ (गुवाहाटी) हे या टीमचे सदस्य होते.
दरम्यान, अबीर मोरे याचे वडील संदीप मोरे हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्याने अबीरला लहानपणापासूनच खेळाचे बाळकडू मिळत गेले. वयाच्या 5 व्या वर्षापासूनच नाशिकच्या आजुबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये अबीर ट्रेक करत होता. त्याच्या वडिलांनी एवरेस्ट बेसकॅम्प पुर्ण केल्यापासूनच त्याने हिमालयातील ट्रेक करण्याचा हट्ट धरला होता. त्यानुसार तो नाशिकसह जिल्ह्यातील अनेक स्पर्धांत सहभाग होत असे.