नवी दिल्ली -संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ 18 जुलैपासून होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीने पावसाळी अधिवेशनाच्या वेळापत्रकाची शिफारस केली आहे. त्यानुसार, ते अधिवेशन 12 ऑगस्टला समाप्त होईल. त्या वेळापत्रकावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब व्हायचे आहे. अधिवेशन काळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदांच्या निवडणुका होतील.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभेचे महासचिव, तर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. आगामी पावसाळी अधिवेशन सध्याच्या संसद भवनातील अखेरचे अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. चालू वर्षातील हिवाळी अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत होण्याची चिन्हे आहेत.