इस्लामाबाद – पाकिस्तानात पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात अपहरण झालेल्या हिंदू मुलीची काल सुटका करण्यात आली. तिचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अटक देखील करण्यात आली असल्याचे पाकिस्तानातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात कामावरून घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. काल चोटाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंगोई भागातून या मुलीची सुटका करण्यात आली. परिसरातील रजा जाफर नावाच्या भू माफियाच्या सांगण्यावरून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. बलात्कार करण्याच्या हेतून हे अपहरण करण्यात आले होते.
बहावलपूर येथील पोलिसांनी या मुलीला सोडवून झेलम येथे परत आणले. अपहरणामागील मुख्य सूत्रधार असलेल्या जफरला अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.
या महिन्याच्या प्रारंभी सिंध प्रांतात एका हिंदू मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांना या मुलीने विरोध केल्यावर तिला गोळ्या घालून मारण्यात आले होते. अल्पसंख्यांक आणि महिलांवर कट्टरवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांबाबत पाकिस्तानातील राजकीय पक्ष आवाज उठवत नसल्याचे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक आयोगाने म्हटले आहे.