पुणे : लोहगाव विमानतळावरील हवाई दलाच्या ताब्यातील 2.68 एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरण करण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कार्गोसेवेच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
विमानतळ विस्तारीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे, मात्र त्यासाठी विमानतळावरील कार्गोचे स्थलांतर करावे लागणार आहे. या स्थलांतरासाठी हवाई दलाच्या ताब्यातील जमीन हस्तांतरण करणे आवश्यक आहे. सुरवातीला ही जमीन वार्षीक भाडे तत्त्वावर देण्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. मात्र यासाठी 1 कोटी 38 लाख 30 हजार रुपये वार्षीक भाडे आकारण्यात येणार होते. हे भाडे जास्त असल्याने विमानतळ प्राधिकरणाने ही जमीन कोणतेही भाडे न घेता हस्तांतरित करावी, अशी मागणी केली होती. याला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. लवकरच विमानतळासाठी आवश्यक 2.68 एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या जमिनीच्या बदल्यात हवाई दलाला इतरत्र जमीन दिली जाणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
विमानतळावर नविन टर्मिनलचे काम सुरू आहे, तसेच हे काम पूर्ण झाल्यावर जुने आणि नविन टर्मिनल जोडण्यात येणार आहे. यादरम्यान कार्गो विभाग असल्याने दोन्ही टर्मिनल जोडण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे प्राधिकरणाने कार्गोचे स्थलांतर करून त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी आवश्यक जमीन ही हवाई दलाच्या ताब्यात होती. आता जमीन हस्तांतरणाचा निर्णय झाल्याने कार्गोसह विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात होते. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सध्याची कार्गोसाठी आवश्यक जागा कमी पडत आहे. त्यामुळे हे विस्तारीकरण आवश्यक असल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे.
विमानतळ विस्तारीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात लवकरच मिटींग होणार असून त्यात हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
– संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ