पुणे : लोहगाव विमानतळावरील पार्किंगची समस्या लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. या परिसरात सुरू असणाऱ्या मल्टिमॉडेल पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात असून सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी माहिती दिली आहे.
विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती प्रवासी संख्या पाहता, भविष्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने मल्टिमॉडेल पार्किंग उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतला. त्यानंतर “पीपीपी’ तत्वावर पेबल्स इंडिया कंपनीला हे काम देण्यात आले.
शिवाय, प्रवाशांसाठी पाचदारी पूल बांधण्यात येत असून त्याचे काम देखील अंतिम टप्यात आहे. तो देखील सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळाला 2017 आणि 2018 मध्ये प्रवाशी सुविधांसाठी गौरविण्यात आले होते.
विमानतळावर प्रवासी सुविधांसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता पार्किंग सुविधा विकसित केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, तिचा वापरही तेव्हाच सुरू होणार आहे. वाहनतळ पूर्ण होताच परिसरतील विस्कळीतपणा थांबेल. वाहनतळाचे दर हे नियमाप्रमाणे असतील.
– संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ
नव्या वाहनतळाची वैशिष्ट्ये
-सहा मजली इमारत. यात दोन तळमजले आणि चार मजले असतील.
-एकावेळी 1,000 कार, 1,000 दुचाकी पार्किंग
-पार्किंग स्लॉट ऑनलाइन बुकिंग
-प्रत्येक मजल्यावर पार्किंगबरोबरच रिटेल स्टोअर्स आणि रेस्टॉरंट
-स्मुथ इन आणि आऊट सुविधा असेल
-सर्व प्रकारची ऑनलाइन पेमेंट सुविधा
विमानतळाची सद्यस्थिती (दररोज)
-81 विमानांचे “टेकऑफ’ आणि तितक्याच विमानांचे लॅन्डिंग
-सरासरी 20 हजार प्रवासी
-एक आंतरराष्ट्रीय उड्डाण आणि लॅन्डिंग
सध्याचे खासगी पार्किंगचे दर
दुचाकी : 20 रुपये दोन तास आणि 160 रुपये 24 तास
चारचाकी : 60 रुपये दोन तास आणि 300 रुपये 24 तास