पुणे – लोहगाव विमानतळावरच प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. डिसेंबर 2022 अखेरपर्यंत नवीन टर्मिनल वापरासाठी खुले होणार आहे. तर, येत्या काळात धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. वायूदलाची आणि विमानतळाच्या परिसरातील 136 एकर जागा उपलब्ध झाल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण शक्य आहे.
गुरूवारी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरिश बापट यांनी विमानतळाला भेट देत लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोहगाव येथे पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येत आहे. 2018 पासून बांधकाम सुरू होते, त्यापैकी 61 टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षाअखेरपर्यंत विमानतळ वापरासाठी खुले होईल. सध्याच्या विमानतळावरील टर्मिनल केवळ 22 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासी आणि विमान कंपन्यांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची असणारी गरज आता पूर्ण होणार आहे, असे बापट म्हणाले.
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी विमानतळ विस्तारीकरणाबाबत बैठक झाली होती. त्यांनी कार्गोसाठी आवश्यक असणारी 13 एकर जागा एक रुपया दराने उपलब्ध करून देण्यासह विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संरक्षण विभागाची 2,360 चौरस मीटर जागा देण्याचे मान्य केले आहे. विमानतळ धावपट्टी विस्तारासाठी 136 एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बापट यांनी नमूद केले.
अशा आहेत सुविधा
अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचवणारे 5 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर, प्रवासी साहित्य वहन यंत्रणा, कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा असतील. यासह चार मजली आणि दोन मजले बेसमेंट असलेली इमारतही बांधण्यात येत आहे. त्यात 1024 वाहनांचे एकावेळी उभी करता येतील.