मुंबई – राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ऍक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारापार गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर आज राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्येने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरूवारी तब्बल 2 हजार 813 रुग्ण आढळून आले आहेत.यात मुंबईत सर्वाधिक 1702 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज एकूण 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,42,190 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.98 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात आज एका करोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे.
राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 11,571 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7998 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1984 इतके सक्रिय रुग्ण आहेत.