पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्ह्यांतर्गत, आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असून याचे ऑनलाईन प्रशिक्षण सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.8) सकाळी 11 ते 1 या वेळेत देण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. या धोरणातील तरतुदींनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आले आहेत. बदलीस पात्र असलेल्या, विशेष संवर्ग भाग-1 मधील, भाग-2 मधील शिक्षकांची यादी निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सन 2022 मधील बदलीही याच प्रणालीद्वारे होणार आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण दिले जाणार आहे.