सिंधुदुर्ग – कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ विदेशी लोकांनाही पडते हे आजवर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. गोव्या सारख्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर ते तुम्हाला प्रत्येक्षात देखील पाहायला मिळाले असेल. याच कोकणात फिरायला आलेल्या एका विदेशी जोडप्याच्या मुलाला थेट येथील जिल्हा परिषदेची शाळा आवडली आणि तो सध्या या शाळेत चक्क मराठीचे धडे घेतोय. हो हे खरं आहे.एका विदेशी चिमुकल्या पाहुण्याला थेट मराठी शाळेचा लळा लागलाय.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर लुकेशिवी कुटुंबीय रशियातून भारतात आले. तळकोकणात फिरत असताना लुकेशीवी कुटुंबाचा अकरा वर्षांचा मुलगा मिरॉन ॲलेगेविज लुकेशिवी याला जिल्हा परिषदेची एक शाळा चांगलीच आवडली आणि त्याने त्याच शाळेत शिकण्याचा निश्चिय केला. सिधुदुर्गमधील सावंतवाडीच्या आजगावमधील ही शाळा आहे.
लुकेशिवी कुटुंबीय सुरुवातील गोव्यामध्ये पर्यटनासाठी होते. त्यानंतर ते सिधुदुर्ग येथून तळकोकणात गेले. कोकणातील निसर्ग आणि खानपानाच्या प्रेमात तर ते आधीपासून होते. मुलाचे शिक्षण सुरु राहावे म्हणून त्यांनी काही इंग्रजी शाळांमध्ये देखील प्रयत्न केले. परंतु मुलाला जिळ परिषदेची शाळा आवडल्याने त्यांनी मुलाला त्याच शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला.
मिरॉन सध्या शाळेमध्ये चांगलाच रमला असून तो मराठी देखील उत्तम शिकतोय. त्यासोबतच स्थानिक काही मुलांसोबत त्याची चांगलीच गट्टी झाल्याचे समजते. शाळेचे सर्व नियम पाळून मिरॉन उत्तमरित्या शिकतोय यामुळे येथील शिक्षक देखील त्याच चांगलच कौतुक करताहेत.