पुणे – जिल्ह्यात 530 प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने केला आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचे सर्व अधिकारी त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांमधील शिक्षकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दुर्गम भागासह इतर ठिकाणीही शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व तालुक्यातील रिक्त जागांची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 530 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.