सातारा – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची बैठक सोमवारी मुंबईत झाली. वन विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (मेरी) प्रस्तावानुसार भारतातील पहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्राला दरे खुर्द (सातारा) येथे मान्यता मिळाली आहे. यासाठी 2017 पासून दरे खुर्द जंगल परिसरात जैवविविधतेचे मापन करण्यात येत होते.
“मेरी’चे अध्यक्ष व मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार, प्रा. डॉ. नेहा बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा मिसाळ (कोळी), प्रज्ञा मोहिते (मासे), शुभम माने (मिलीपिड्स), साक्षी कदम (पतंग), श्वेता सुतार (फुलपाखरे), रसिका बागल (मातीतील सूक्ष्मजीव), गायत्री पवार (पतंग), प्रज्ञा भोसले (सरपटणारे व उभयचर जीव), वैभव बावडेकर (बुरश्या), अरुणा शेलार (पक्षी), प्रणाली चव्हाण (रानभाज्या) यासह वन्यजीव व वनस्पतीसमूहांवर संशोधन करण्यात आले. या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी व मापन करण्यात आले. हे संशोधन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
महादरे जंगल परिसरात गवा, सांबर, भेकर, बिबट, माळसडा, पिसोरी, कोल्हा, लांडगा या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, मलाबार बॅंडेड पिकॉक, ऑर्किड टिट, स्मॉल ऑरेंज टीप, ग्रेट ऑरेंज टीप, पंचमढी बुशब्राऊन, लॉंग बॅंडेड सिल्व्हर लाइन, कमांडर, जोकर या प्रकारचीफुलपाखरे, इमराल्ड डव्ह, तांब, काळा गरुड, सर्प गरुड, रानकोंबड्या, तीतर, धाविक, वेगवेगळे पाणपक्षी, विशेष करून युरोपातून येणाऱ्या रेड थ्रोटेड फ्लायकॅचर या आंतरखंडीय स्थलांतरित चिमणीची नोंददेखील या परिसरात घेण्यात आली. नाग, मण्यार, फुरसे, घोणस यासह पश्चिम घाटात प्रकर्षाने आढळणारा बांबू पीट वायपर, पश्चिम घाटात आढळणाऱ्या चेर, नाना, हिरडा, शिकाकाई, मैदानी प्रदेशात आढळणाऱ्या करंज, बाभूळसारख्या वनस्पती, दुर्मिळ ऑर्किड्स पाहायला मिळतात. महादरेच्या 105 हेक्टर परिसरात पसरलेल्या जंगलात एकूण 467 प्रकारच्या वनस्पती व 47 रानभाज्यांची नोंद करण्यात आली.
सस्तन वन्यप्राण्यांच्या 20, पक्ष्यांच्या 118, सरपटणारे-उभयचर 16, मासे 22, सहस्रपाद 3, पतंग 80 कोळी 110 प्रजाती आणि फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण 178 प्रजाती आढळल्या आहेत. क्रिमसन रोज, मलाबर बॅंडेड पिकॉक, तमिळ स्पॉटेड फ्लॅट, सदर्न बर्डविंग, स्मॉल ग्रास ज्वेल, सदर्न बर्डविंग, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, ऑर्किड टिट व व्हाइट टिप्ड लाइन ब्लू ही अतिशय दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे या ठिकाणी आढळतात. या प्रस्तावासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, कोल्हापूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, साताराचे तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सध्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वनाधिकारी (कोल्हापूर) सागर गवते, सातारच्या वनक्षेत्रपाल शीतल राठोड, डॉ. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.