संदीप राक्षे
सातारा – शहरातील फूटपाथ नक्की कोणासाठी, असा प्रश्न न पडलेला एकही सातारकर सध्या सापडणार नाही. राजवाड्यासमोरील गोलबागेपासून राजपथावर दोन्ही बाजूंना विक्रेत्यांनी फूटपाथवर केलेली अतिक्रमणे पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे फूटपाथ अनधिकृत विक्रेत्यांना आंदण दिले आहेत का? या फूटपाथवरील अतिक्रमणांचा वाढता विळखा केव्हा सुटणार, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
राजवाडा येथील गोलबागेपासून (जवाहर बाग) राजपथाच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर सध्या किरकोळ विक्रेत्यांचे साम्राज्य आहे. राजवाड्याडकडून पोवई नाक्याकडे जाताना, राजपथावर उजव्या बाजूला डिंगणकर स्टोअर्सचा कॉर्नर आणि डाव्या बाजूला प्रेमाचा चहा कॉर्नरपासून अतिक्रमणे केलेले विक्रेते मोती चौकापर्यंत दाटीवाटीने पथाऱ्या टाकून पादचाऱ्यांची अडवणूक करत आहेत. पावलोपावली बसलेल्या या विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये अपघातांचा धोकाही वाढला आहे. मोती चौकातील चरणसेवा फूटवेअरपासून जांभळी चौकापर्यंतच्या रस्त्यावर काही विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. फूटपाथवर पानटपऱ्यांची अतिक्रमणे सर्वाधिक झाल्याचे निदर्शनास येत आहे.
राजपथालगतच्या साइडपट्ट्या दुरुस्तीच्या काळात गायब झालेल्या अनेक पानटपऱ्या, वडापावचे गाडे पुन्हा रस्त्यावर दिसू लागले आहेत. या रस्त्यावर संध्याकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यावेळी नेमके भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बसलेले असतात. खालचा रस्ता अर्थात मोती चौक ते शनिवार चौकापर्यंत दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. असंख्य प्रकारच्या विक्रेत्यांनी हा रस्ता व्यापला आहे. विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या वस्तूंमुळे रस्त्यावरून चालायला जागाच उरत नाही. या विक्रेत्यांवर कारवाई करावी अथवा त्यांची नोंदणी करून, विक्रीसाठी जागा नेमून देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यालगतचा फूटपाथ हा पादचाऱ्यांसाठी असतो. रस्त्यावरची वाहतूक निर्धोक असावी, हा त्यामागचा उद्देश आहे. साताऱ्यातील फूटपाथ अतिक्रमणे करणाऱ्यांसाठी आहे, ही चुकीची मानसिकता निर्माण झाली आहे. फूटपाथ व्यापणाऱ्यांकडून भाडे वसूल करणे, हादेखील आणखी एक चुकीचा पायंडा आहे. राजवाडा येथील फळगाड्यांची अतिक्रमणे काढल्यास तेथे शंभर दुचाकी वाहनांचे पार्किंग होईल. त्यासाठी पालिकेने कठोरपणे अतिक्रमणे मुळातून काढायला हवीत.
प्रशांत मोदी, पेढ्यांचे व्यापारी