मुंबई ( mumbai corona update ) – एकीकडे मान्सून तोंडावर असतानाच करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. शहरातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मुंबईतील करोना सकारात्मकतेचा दर वाढून ६ टक्क्यांवर गेला आहे. मुंबई महापालिकेने अधिकाऱ्यांना चाचण्यांची संख्या युद्धतपातळीवर वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय प्रयोगशाळांना देखील पूर्ण क्षमतेने काम करण्यास सांगण्यात आले आहे.
१२ ते १८ वयोगटातील बालकांचे लसीकरण तसेच लसीचा बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचाही आदेश मुंबई महापालिकेने दिला आहे. मान्सून आगमनावेळी साथीचे आजार पसरत असतात. अशातच करोना रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने लक्षणं असलेल्या बाधितांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी जम्बो कोव्हीड सेंटर्सना देखील कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या तयार ठेवण्यास सांगण्यात आलंय.
गतवर्षी प्रमाणे करोनाची लाट शिखरावर पोहोचल्यास रुग्णांना उपचार मिळवावेत यासाठी खासगी रुग्णालयांना देखील अलर्ट करण्यात आले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढल्यास मालाड येथील जम्बो कोव्हीड सेंटर प्राधान्याने वापरण्यात येणार आहे.
मंनगलवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांमधे मुंबईत ५०६ नवे बाधित आढळून आलेले होते. ही संख्या फ्रेब्रुवारीपासूनची सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मुंबईमध्ये मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत १०० टक्के वाढ झाली आहे.