श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या केली. दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून संबंधित कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या.
बडगाम जिल्ह्यातील तहसील कार्यालयात अचानकपणे दोन दहशतवादी घुसले. त्यांनी लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या राहुल भट यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये जखमी झालेल्या भट यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचू शकला नाही. काश्मिरी पंडित आणि इतर स्थलांतरितांसाठी विशेष रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे.
त्या योजनेंतर्गत भट सरकारी सेवेत रूजू झाले होते. त्यांच्या हत्येचा जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. हल्ल्यानंतर पलायन करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल करण्यात आला. तेव्हापासून दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र सुरू केले आहे.
दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायातील सदस्यांना आणि परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत. त्यातून ऑगस्ट 2019 ते मार्च 2022 या कालावधीत काश्मिरी पंडितांसह हिंदू समुदायातील 14 सदस्यांची हत्या झाली.