Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये (एनसी) हातमिळवणी झाली. त्या पक्षांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जागावाटप निश्चित केले. त्यानुसार, दोन्ही पक्ष प्रत्येकी ३ जागा लढवेल. त्यांच्यातील समझोत्यामुळे इंडिया आघाडीतील ऐक्याला तडा गेल्याचे स्पष्ट झाले. त्या आघाडीतील आणखी एक घटक पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने रविवारी काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या ३ जागांवरील उमेदवार जाहीर केले. त्यामुळे इंडियाच्या घटक पक्षांमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याचे संकेत मिळाले. त्यावर कॉंग्रेस आणि एनसीने सोमवारी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेने शिक्कामोर्तब केले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि एनसीचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषदेत त्यांचा पक्ष आणि कॉंग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी सलमान खुर्शिद आणि पवन खेडा हे कॉंग्रेस नेते उपस्थित होते.
जागावाटपाच्या सुत्रानुसार एनसी अनंतनाग, श्रीनगर आणि बारामुल्ला या जागा लढवले. त्या तिन्ही जागा मागील वेळी त्या पक्षाने जिंकल्या होत्या. कॉंग्रेस उधमपूर, जम्मू आणि लडाख या जागांवर उमेदवार देईल. मेहबुबा यांच्या पीडीपीशी समझोता झाला नसला तरी तो पक्ष इंडियाचाच घटक असल्याची भूमिका खुर्शिद यांनी मांडली. जम्मू-काश्मीर क्षेत्रफळानुसार छोटा भाग आहे. त्यामुळे भरपूर प्रयत्न करूनही जागावाटपासंदर्भात तडजोड करण्यासाठी फारशी संधी नाही, अशी सारवासारवही त्यांनी केली.
पीडीपीने अनंतनाग, श्रीनगर आणि बारामुल्लामधील उमेदवार जाहीर केले आहेत. अनंतनागमधून मेहबुबा निवडणूक लढवणार आहेत. त्या जागेवरून माजी मुख्यमंत्री आणि डीपीएपीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद हेही नशीब आजमावणार आहेत.