ढाका – विदेशी गंगाजळीच्या दीर्घकालिन व्यवस्थापनाचा विचार करून बांगलादेशने अनावश्क प्रकल्प पुढे ढकलले आहेत. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सरकार परकीय चलन व्यवस्थापनाबाबत अत्यंत सावध आहे, असे बांगलादेशचे अर्थमंत्री ए एच एम मुस्तफा कमाल यांनी बुधवारी सांगितले.
जगाला एका असामान्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि सरकार या क्षणी कोणतेही अनावश्यक परकीय चलन खर्च करू इच्छित नाही. चैनीच्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही कमाल म्हणाले.
देशातील परकीय चलनाचे संकट टाळण्यासाठी सरकारने तातडीने आवश्यक नसलेल्या प्रकल्पांना सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ विलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी तातडीने आणि आवश्यक असल्याशिवाय सरकारी अधिकारी कोणताही परदेश दौरा करणार नाहीत, असे निर्देश दिले आहेत, असे परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबाबत बोलताना मुस्तफा कमाल म्हणाले.
जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतात. जगातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन हे निर्णय घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
बांगलादेशच्या बॅंक ऑफ बांगलादेशने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये बांगलादेशकडे 44.08 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता. गेल्या वर्षी ऑगस्टमधील 48 अब्ज डॉलरवरून हे प्रमाण खाली आले. तथापि, बांगलादेशचा परकीय चलन गंगाजळी 5-6 महिन्यांच्या सरासरी आयात बिलासाठी पुरेशी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.