सातारा -सातारचे खा. उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खा. संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. पोलिसांनी अटक केल्यानंतर ऍड. सदावर्ते यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
अधिक माहिती अशी, मराठा आरक्षणासंदर्भात दीड वर्षापूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी ऍड. सदावर्ते यांनी राज्यसभेचे खा. उदयनराजे व कोल्हापूरचे खा.संभाजीराजे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात सदावर्ते यांना शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
या कोठडीची मुदत संपल्यानंतर ऍड. सदावर्ते यांना सोमवारी (दि. 18) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होती. त्यावेळी सरकारी पक्षाच्या आणि ऍड. सदावर्ते यांच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीनंतर त्यांना 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.