पुणे – किडनी रॅकेटप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने किडनी प्रत्यारोपणातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित खासगी रुग्णालयातील प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉक्टर यांची बुधवारी दिवसभर “इन कॅमेरा’ कसून चौकशी केली. त्यानंतर ते त्यांचा अहवाल देणार आहेत.
किडनीप्रकरणात नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने याआधी प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना दिला होता. त्यानंतर खासगी रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केला होता. तसेच, अवयव प्रत्यारोपण विभागीय मान्यता समितीचे अधिकार काढून घेतले होते.
या प्रकरणात बुधवारी आणखी याच समितीने पुणे आरोग्य परिमंडळ कार्यालयात दिवसभर चौकशी केली. या चौकशीला आरोग्य खात्यातील अधिकारी देखील उपस्थित होते. यामध्ये रुग्ण, नातेवाईक आणि सबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची दिवसभर चौकशी सुरू होती. या चौकशीत बरीच गुप्तता पाळण्यात आली आहे. “याप्रकरणी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य विभागाकडून अभिप्राय आल्याशिवाय स्वतःहून काही कारवाई करता येऊ शकत नाही. आरोग्य विभागाकडून अभिप्राय आल्यावरच संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो,’ अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनयाक वेताळ यांनी दिली.