पिंपरी -सोशल मीडियाद्वारे आता महापालिका शाळांचे “ब्रॅंडींग’ होणार आहे. येत्या 15 दिवसांत हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत महापालिकेच्या मराठी शाळा मागे पडतात, अशी ओरड कायम केली जाते. महापालिका शाळा भौतिक सुविधांमध्ये काही प्रमाणात कमी पडतात. तथापि, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत महापालिकेच्या सर्व 123 शाळांमध्ये ई-क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्राथमिक शिक्षणातंर्गत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रोग्राम मॅनेजर, एज्युकेशन को ऑर्डिनेटर आदी सल्लागार नियुक्त केले जाणार आहे. त्याशिवाय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, वह्या, गणवेश, स्वेटर व अन्य शालेय साहित्य दिले जाते. आदी बाबींविषयी नागरिकांना माहिती मिळावी, महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, या उद्देशाने महापालिका शाळांचे “ब्रॅंडींग’ करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शिक्षण विभागाकडून स्वतंत्र यूट्यूब चॅनेल , फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्या माध्यमातून देखील शाळांच्या ऍक्टिव्हिटीची माहिती देण्यात येणार आहे. तंत्रस्नेही शिक्षक आणि “स्मार्ट सिटी’ अंतर्गत कार्यरत तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.