कोलोंबो – श्रीलंकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास अध्यक्ष गोताबाये राजपक्षे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मात्र संसदेमध्ये 113 सदस्यांचे संख्याबळ सिद्ध करणाऱ्या कोणत्याही पक्षाकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजपक्षे यांनी अधियक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. देशातील अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि वीज कपातीमुळेही राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर राजपक्षे यांनी सोमवारी राजकीय बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
संसदेमध्ये कोणत्या पक्षाचे बहुमत आहे, हे आजमावण्यासाठी आज संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. देशभरात सरकारविरोधी आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 26 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजपक्षे यांनी देशात “एकता सरकार’ स्थापन करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
श्रीलंका फ्रिडम पार्टी आणि काही सत्तारुढ खासदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता श्रीलंकेतील सरकार अल्पमतात आले आहे. आता “एसएलपीपी’ने संसदेतील 113 सदस्यांचे बहुमत आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे किमान बहुमताच्या जोरावर सरकार चालवता येऊ शकेल आणि महिंदा राजपक्षे हे पंतप्रधान म्हणून कायम राहू शकतील.