मुंबई – ओडेन स्मिथची वादळी खेळी व प्रमुख फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 5 गडी व 1 षटक राखून पराभव केला व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा 19 व्या षटकातच 5 बाद 208 धावा करत यशस्वी पाठलाग केला व सामना जिंकला. नवनियुक्त कर्णधार मयंक आग्रवालसह पंजाबच्या डावाची सुरुवात करत शिखर धवनने संघाला 71 धावांची सलामी दिली. आग्रवाल 32 धावांवर परतला तर, धवन 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक 43 धावांची खेळी केली. त्याला महंमद सिराजने बाद केले. त्याच्या जागी आलेला राज बावा सिराजच्याच गोलंदाजीवर खातेही न उघडता परतला. यावेळी सिराजला हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र, त्याने लागोपाठ वाइड चेंडू टाकले. त्यावेळी लियाम लिव्हिंगस्टोनने चांगली सुरुवात केली. मात्र, त्याला आकाशदीपने तंबूचा रस्ता दाखवला. अखेर ओडेन स्मिथ व शाहरुख खान यांनी अखंडित अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. स्मिथने अवघ्या 8 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या आतषबाजीने नाबाद 25 धावा केल्या. तर शाहरुखने नाबाद 24 धावांची खेळी करताना 20 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
तत्पूर्वी कर्णधार फाफ डुप्लेसी व माजी कर्णधार विराट कोहली यांच्या फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 206 धावा करण्याचे आव्हान ठेवले. पंजाबचा कर्णधार मयंक आग्रवालने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर कर्णधार डुप्लेसीने अर्जुन रावतच्या साथीत संघाला अर्धशतकी सलामी दिली. राहुल चहरने रावतचा त्रिफळा उडवला. त्यानंतर डुप्लेसीने कोहलीला साथीला घेत शतकी भागीदारी करत संघाला दीडशतकी धावांची मजल मारून दिली. मात्र, तो शतक साकार करण्यात अपयशी ठरला. तो 57 चेंडूत 3 चौकार व तब्बल 7 षटकारांची आतषबाजी करून 88 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकने कोहलीला सुरेख साथ दिली. या जोडीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. कोहलीने 29 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 41 धावा केल्या. तर वादळी फलंदाजी करताना कार्तिकने अवघ्या 14 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांची बरसात करताना नाबाद 32 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 2 बाद 205 धावा. (फाफ डुप्लेसी 88, अर्जुन रावत 21, विराट कोहली नाबाद 41, दिनेश कार्तिक नाबाद 32, राहुल चहर 1-22, अर्शदीप सिंग 1-31). पंजाब किंग्ज – 19 षटकांत 5 बाद 208 धावा. (शिखर धवन 43, भानुका राजपक्षे 43, मयंक आग्रवाल 32, ओडेन स्मिथ नाबाद 25, शाहरुख खान नाबाद 24, महंमद सिराज 2-59).