मुंबई – महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडल्यानंतर नवा कर्णधार रवींद्र जडेजा याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी आज होत आहे. यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघांचे कर्णधार आपापल्या संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व करत आहेत. रवींद्र जडेजा चेन्नईचे तर श्रेयस अय्यर कोलकाताचे कर्णधारपद भूषवत आहे.
सीएसके विरुद्ध केकेआर
ठिकाण – वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ – संध्याकाळी 7ः30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
या स्पर्धेच्या इतिहासात या दोन संघात सातत्याने चुरस पाहायला मिळाली होती, तशीच या सलामीच्या लढतीतही रंगेल अशीच अपेक्षा आहे. यंदाच्या स्पर्धेत हे दोन संघ नवा गडी नवा राज या स्वरूपात खेळणार आहेत. मात्र, स्पर्धेचा इतिहास पाहिला तर चेन्नईचेच पारडे जड राहिले असल्याचे दिसून येते. या दोन संघात आयपीएलच्या इतिहासात आजवर 28 सामने झाले असून त्यात चेन्नईने 18 तर कोलकाताने 9 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता.
– सलामीच्या लढतीत नाणेफेक महत्त्वाची
– दुसऱ्या डावात दवाचा परिणाम
– खेळपट्टी पाहता 170 ते 190 धावा शक्य
– धोनीने नेतृत्व सोडल्यामुळे चेन्नईच्या कामगिरीवर लक्ष
– नेतृत्वाचा भार गेल्यामुळे धोनीचा प्रतिस्पर्धी संघांना धोका वाढला
– धोनीची अखेरची स्पर्धा ठरण्याची शक्यता
– व्हिसाच्या प्रश्नामुळे मोईन अली पहिल्या सामन्याला मुकणार
– जायबंदी असलेल्या दीपक चहरच्या समावेशावर प्रश्नचिन्ह
– सलामीचा सामना वानखेडेवर असल्याने फलंदाजांना होणार लाभ
– दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे कडेकोट सुरक्षा
– खेळाडूंच्या प्रवासादरम्यान सामान्य वाहतूक ठरावीक भागात बंद
चेन्नईने आपली कोलकाताविरुद्धची 220 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली होती तर कोलकाताने चेन्नईविरुद्ध 202 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. निचांकी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात चेन्नईचा संघ 114 धावांत कोलकाता संघ 108 धावांत गारद झाला होता. आता यंदाच्या मोसमात या दोन संघात कोणता संघ बाजी मारेल याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे.
महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या मोसमातील सामने सुरू होण्यापूर्वीच चेन्नई संघाचे नेतृत्व सोडल्याचे जाहीर केले व धक्का दिला. मात्र, तरीही खेळाडूंच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास नवनियुक्त कर्णधार रवींद्र जडेजाने व्यक्त केल्याने खरा धोका कोलकाता संघासमोर निर्माण झाला आहे. दोन्ही संघांचे बलाबल कागदावर तोलामोलाचे असले तरीही धोनीच्या नेतृत्वातून शिकलेल्या जडेजाच्या संघावर मात करण्याचे आव्हान कोलकातासमोर आहे.
कोलकाताकडे व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, कर्णधार श्रेयस अय्यर, चामिका करुणारत्ने, नीतिश राणा व सॅम बिलिंग्ज असे खंदे फलंदाज आहेत. गोलंदाजीत त्यांच्याकडे वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, बिलिंग्ज यांच्या जोडीला अष्टपैलू आंद्रे रसेलही असल्याने मध्यम व वेगवान गोलंदाजीचा ताफाही सरस आहे. त्यातच नरेन व व्यंकटेश अय्यर उपयुक्त गोलंदाजीही करत असल्याने त्यांच्याकडे पर्यायही खूप आहेत.
दुसरीकडे चेन्नईचा संघही काही कमी नाही.
धोनीने नेतृत्व सोडले असले तरीही संपूर्ण स्पर्धेत तोच त्यांचा प्रमुख खेळाडू आहे यात शंका नाही. त्याच्या जोडीला ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, डेव्हन कॉनवे असा फलंदाजांचा ताफा आहे. तसेच नवा कर्णधार रवींद्र जडेजा, राजवर्धन हंगरगेकर, ऍडम मिल्ने, ड्वेन प्रीटोरियस हे अनुभवी गोलंदाजही आहेत. त्यांच्या जोडीला ब्राव्हो व जडेजा हे अष्टपैलू खेळाडूही आहेत जे समोरच्या संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडू शकतात.