नवी दिल्ली – तालिबानकडून हत्या करण्यात आलेले आणि पुलित्झर पुरस्कार विजेते फोटोग्राफर आणि पत्रकार दानिश सिदीदीकी यांच्या कुटुंबीयांनी तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यात यावा आणि या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. तालिबानच्या वरिष्ठ कमांडरसह, तालिबानचे नेत्यांविरोधात सिद्दीकी यांच्या हत्येची तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे सिद्दीकी यांचे वकील अवि सिंह यांनी आज सांगितले.
सिद्दीकी हे आपल्या कामानिमित्त अफगाणिस्तानमध्ये गेले असता गेल्या वर्षी 16 जुलै रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सिद्दीकी हे फगाणिस्तानातील कंदहार जिल्ह्यातील स्पिन बोलडाक येथे अफगाण सैन्य आणि तालिबान दरम्याच्या संघर्षाचे वार्तांकन करत होते.
तालिबानचे कमांडर, हंगामी पंतप्रधान मोहंम्मद हसन आखुंद आणि हंगामी उपपंतप्रधान अब्दुल घनी बरादर यांच्याविरोधातील अधिकृत तक्रार आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात देखल करण्यात आली आहे. या संदर्भात भारत सरकारचीही मदत घेतली जाईल, असेही सिंह यांनी सांगितले. दानिश सिद्दीकी यांचे पालक अख्तर सिद्दीकी आणि साहिदा सिद्दीकी यांच्यावतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.