मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची आज(सोमवार,दि.21) तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तरीही शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून अभिवादन का नाही केले? असा मुद्दा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.
महाविकास आघाडी सरकार येण्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी अधिवेशन असताना कधीही तिथीनुसार जयंती साजरी झाली नाही. कधीही फोटो लावण्यात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जन्मतारीख किंवा तिथीचा वाद घालण्यापेक्षा ते आपले सगळ्यांचे दैवत आहेत, हे त्रिवार सत्य आहे.
मागील काळात आघाडीचे सरकार असताना माजी मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांनी महाराजांचा जन्म कधी झाला याचा शोध लावला व 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख निश्चित झाली. तेव्हापासून महाराष्ट्राचे प्रत्येक मुख्यमंत्री शिवनेरी येथे शिवजयंती साजरी करत आहेत. आजतागायत सर्वच मुख्यमंत्र्यांनी ही प्रथा सुरु ठेवली. सरकारच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख म्हणून तिथे जयंती साजरी करण्यासाठी गेले आहेत. शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून ते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. आम्ही तारखेप्रमाणे जयंती साजरी करत आलो आहोत. कोणत्याही नागरिकाला तिथीप्रमाणे वा तारखेप्रमाणे जयंती साजरी करायची असेल तर तसे करण्याची मुभा असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.