पुणे- पुणे महानगरपालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी 433.19 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे पीएमपीची यंदाची म्हणजे 2021-22 ची अंदाजित संचलन तूट 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी 60 टक्के स्वामित्व हिस्सा पुणे मनपाचा असून, त्यानुसार सुमारे 366 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या 1 हजार 249 बसेस आहेत. तर भाडेतत्त्वावरील 806 सीएनजी बसेस आणि 150 ई- बस या 956 बसेस आहेत. तर नवीन 350 ई-बस आणि फेम-2 अंतर्गत 150 अशा 500 नवीन ई-बसेस दाखल होणार असून, ही एकूण बस संख्या 2,571 होणार आहे.
पीएमपीचे आर्थिक गणित साधण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दरवर्षी संचलन तूट देते. मागील दोन वर्षांपासून करोनामुळे बसेसची सेवा काही महिने स्थगित केली होती. त्यामुळे उत्पन्न देखील कमी झाले आहे. परिणामी संचलन तूट वाढली असल्याचे चित्र आहे. केवळ संचलन तूटच नव्हे तर पासेसचे अनुदान आणि सातव्या वेतन आयोगाचा फरकासाठी पालिकेने तरतूद केली आहे.
- 2021-22 एकूण उत्पन्न
- 339.19 कोटी रुपये
- 2021-22 खर्च
- 950.15 कोटी रुपये
पुणे महानगरपालिकेच्या सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात पीएमपीसाठी केलेल्या तरतुदी
- तरतूद तपशील -तरतूद रक्कम (कोटींत)
- संचलन तूट – 366.58
- पासेस
- 5 ते 10 वी विद्यार्थ्यांना मोफत पासेस – 6.50
- नागरवस्ती विकास योजना अंध/अपंग पासेस – 10.00
- विविध सवलतीचे पासेस – 20.11
- सातवा वेतन आयोग फरक – 30.00