स्त्रीत्वाचा अधिकृतपणे जागर करण्याचा आजचा दिवस. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत घेलेल्या निर्णयानुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात “द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या कम्युनिस्ट कार्यकर्तीने “सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली.
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दिवसभरात जास्तीत जास्त दहा तास काम आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा “जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराने मांडलेला ठराव पास झाला.
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मात्र देश प्रजासत्ताक होताना सज्ञान पुरुष आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्या घटनाकारांनी केले आहे. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला याच संदर्भात पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
1975 हे वर्ष युनोने “जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यामुळे स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया “बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्याकडून तसेच बॅंका, खासगी व सरकारी कार्यालयांमधूनही 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होतो.
– विलास पंढरी