सातारा -खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्रसमूह, सातारा शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्यावतीने उद्या, दि. 24 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती “जलमंदिर पॅलेस’मधील अधिकृत सूत्रांनी दिली.
खा. उदयनराजेंचा वाढदिवस गुरुवारी (दि. 24) विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता जलमंदिर येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने खा. उदयनराजे यांची तुला करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, सकाळी 8 वाजता जलमंदिर येथे भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर उदयनराजे विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी भेटी देणार आहेत.
पाल येथील खंडोबा देवस्थानला भेट देऊन उदयनराजे जलाभिषेक करणार आहेत. करंजे येथे कातकरी वस्तीत खाऊवाटप, पोवई नाका मंडईत केक कापून हॉकर्स संघटनेच्यावतीने सरबत वाटप सकाळी 10.30 वाजता होणार आहे. माची पेठेत प्रशांत आहेरराव मित्रसमूहाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उदयनराजे 11 वाजता भेट देणार आहे. बारावकरनगरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुपारी 12 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सत्कार आणि रुग्णांना फळवाटप केले जाणार आहे. माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट व विनीत पाटील मित्रसमूहाच्यावतीने दुपारी 12.30 वाजता अन्नदान केले जाणार आहे. रिमांड होम येथे मुलांना खाऊवाटप केले जाणार आहे.
किडगाव येथे 1 वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. साताऱ्यात गांधी मैदानावर सायंकाळी 5 वाजता रिक्षासुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेच्या उद्घाटनाला खा. उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. राधिका रोडवरील हॉटेल सितारा आणि कदम टूर्स अँड ट्रॅव्हलच्या रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राचे उद्घाटन 6 वाजता उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. करंजे येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर रात्री 8 वाजता स्वराज योद्धा कार्यक्रमास
खा. उदयनराजे उपस्थित राहणार आहेत. सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी रात्री 8.15 वाजता खा. उदयनराजे भोसले जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी उपलब्ध राहणार आहेत. त्यानंतर पुसेगाव व परळीतील कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.