संयुक्तराष्ट्रे – जगभर पसरलेला कोविड, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निर्माण झालेले आव्हान आणि जगात सर्वत्र नव्याने निर्माण झालेले संघर्ष यामुळे सध्याची जगाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे असे प्रतिपादन संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी केले आहे. त्यांच्या सरचिटणीसपदाची दुसरी टर्म आता सुरू झाली असून त्यानिमीत्त असोसिएटेड प्रेसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. बायडेन यांच्या प्रमाणेच रशिया हा देश युक्रेन मध्ये अतिकम्रण करून तो ताब्यात घेणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, पाच वर्षांपुर्वी जगाची जी स्थिती होती त्यापेक्षा जगाची आता अत्यंत खराब हालत झाली आहे. सगळीकडे संघर्ष उद्भवताना दिसत आहेत, करोनामुळे आर्थिक नुकसानही बरेच झाले असून त्यातून सावरण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या टर्म मध्ये आपले प्राधान्य कशाला असेल असे विचारता ते म्हणाले की जगातील संघर्ष थांबवून शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. सध्या युक्रेनचा विषय सगळीकडे गाजत आहे.
तथापि रशिया त्या देशावर अतिक्रमण करून तो देश आपल्या ताब्यात घेईल असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. ते म्हणाले की आज संयुक्तराष्ट्र संघटनेला कोणतेही अधिकार नाहीत, पण आम्ही प्रभाव टाकू शकतो आणि मध्यस्थी करू शकतो. त्याचाच वापर करून संघर्ष थांबवण्यावर मी भर देणार आहे असे त्यांनी नमूद केले.