मुंबई – राज्यातील सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील शाळांबाबत ठोस माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती, काही तासांपूर्वीच मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईतील शाळा 24 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या सोमवारीच मुंबईतील शाळांचीही घंटा वाजणार हे नक्की झाले आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे, ज्यांना शाळेत यायचे आहे ते शाळेत येऊ शकतात, ज्यांना यायचे नाही, ते ऑनलाइन सहभाग नोदवू शकतात, अशीही माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा करोनाचा कहर वाढल्याने सुरू झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत.
ज्या ठिकाणी करोना संसर्ग कमी असेल तिथे 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन निर्णय घेतील.