पुणे – “शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे काम पहिल्या टप्प्यात “लाइफलाइन’ या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीला राज्यातील आठ ठिकाणी काम देण्यात आले होते. या कंपनीने बोगस कागदपत्रे सादर करून काम मिळविले,’ असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. “या कंपन्याच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे याविषयी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे. राज्यपालांची भेट घेणार आहे,’ असे सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या यांनी बुधवारी औंध येथील पीएमआरडीए कार्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेक कंपन्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा आणि डावा हात भागीदार आहे, असे सांगत सोमय्या यांनी प्रत्यक्ष नाव घेण्याचे टाळले. ते म्हणाले, जी कंपनी अस्तित्वातच नव्हती त्या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले.
आज मी सगळ्या फाइल तपासल्या. त्यानंतर माझी शंका पक्की झालेली आहे. हे कोविड केंद्र ज्या पद्धतीने दिले गेले, बेनामी ओनरशीप कोणाची आहे, हे सगळे पुरावे राज्यपालांना देणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.