पुणे – शहर हद्दीतील महामार्गांवरून प्रवास करताना अधिक वेगाने गाडी चालविणाऱ्या 21 हजारांवर वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी दंडवसुली केली आहे. त्यामुळे शहर परिसरात वाहनांच्या “ओव्हर स्पीडिंग’चा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वाहन वेगात चालविणे, वाहनावरील नियंत्रण सुटणे हे अनेक अपघातांमागील प्रमुख कारण असते. नागरिकांना वाहन वेगमर्यादेनुसार चालवण्याचे आवाहन करूनदेखील अनेकांकडून वेग मर्यादा ओलांडली जात आहे. अशा वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महामार्गांवर वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत असल्याचा प्रत्यय अनेकांनी घेतला आहे.
शहर पोलिसांकडून “इंटरसेप्टर’ वाहनांवर कारवाई करण्यात येत असून, जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीत 21 हजार 352 वाहनांवर कारवाई केली आहे. सुमारे 40 हजारांहून अधिक रुपयांचा दंड आकारला आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना “इंटरसेप्टर’ वाहने दिली आहे. या वाहनांद्वारे धावत्या वाहनाचा वेग मोजता येत असून, वाहनांमध्ये कॅमेरासह अद्ययावत यंत्रणा असते. याद्वारे अति वेगात वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वाहतूक शाखेकडील वारजे आणि सिंहगड रस्ता विभागांकडे प्रत्येकी एक इंटरसेप्टर वाहन आहे.