पाटण (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी बाजी मारली आहे. 17 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पाटण नगरपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले आहे.
पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली आहे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पाटण नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा आयोजित केली होती. त्यामुळे पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते.
सकाळी दहा वाजता बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या ठिकाणी मतमोजणीस सुरूवात झाली यावेळी प्रभाग एकमधून राष्ट्रवादी पुरस्कृत स्वप्निल माने यांना 331 मते मिळाली तर शिवसेनेच्या गणेश भिसे यांना केवळ 82 मतांवर समाधान मानावे लागले याठिकाणी स्वप्निल माने यांनी गणेश भिसे यांचा पराभव केला प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीअंतर्गत सुषमा मोरे व सविता मोरे या दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन सुषमा मोरे या 204 मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग तीनमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक सागर माने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे जगदीश शिंदे यांनी 236 मते मिळवून सागर माने यांचा 28 मतांनी पराभव केला तर प्रभाग 4 मध्ये माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण पराभूत झाले असून राजेंद्र राऊत 36 मतांनी निवडून आले. शिवसेनेचे उमेदवार शंकर कुंभार यांना केवळ 9 मते मिळाली. प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत संजना जवारी यांनी शिवसेनेच्या सोनाली पवार यांचा तब्बल 120 मतांनी पराभव केला तर प्रभाग सातमध्ये शिवसेनेचे नानासो पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर पोतदार यांनी 105 मताने पराभव केला.
प्रभाग 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनम फुटाणे यांनी शिवसेनेच्या जयश्री शिंदे यांचा तब्बल 231 मतांनी पराभव केला. प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संज्योती जगताप यांनी शिवसेनेचे गंगा भोळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी अंतर्गतच लढाई पाहण्यास मिळाली. प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पवार यांनी शिवसेनेच्या संतोष शंकर पवार यांचा 97 मतांनी पराभव केला.
विद्यमान नगराध्यक्षांचा पराभव
पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून विद्यमान नगराध्यक्ष अजय कवडे यांचा पराभव झाला तसेच माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांचा राष्ट्रवादी अंतर्गत लढत होऊन राजेंद्र राऊत यांनी पराभव केला. तर प्रभाग 3 मधून निवडणूक लढवणारे भाजपचे विद्यमान नगरसेवक सागर माने यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादी अंतर्गतच संघर्ष पाहण्यास मिळाला या ठिकाणी किशोर गायकवाड यांनी बाजी मारत 75 मते मिळवून विजय मिळवला या ठिकाणी विद्यमान नगराध्यक्ष अजय कवडे यांचा पराभव झाला त्यांना केवळ 26 मते मिळाली प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन कुंभार यांनी सेनेच्या राहुल देवकांत यांचा 122 मतांनी पराभव केला.
यांना मिळाली पुन्हा संधी…
पाटण नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे तर प्रभाग 17 मधून स्वीकृत नगरसेवक उमेश टोळे यांनी बाजी मारत पुन्हा नगरपंचायत एन्ट्री केली आहे. तर राजेंद्र राऊत यांनाही संधी मिळाली आहे याअगोदर त्यांच्या पत्नी रेश्मा राऊत या नगरसेवक होत्या.
प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता देवकांत यांनी सेनेच्या पुनम घोणे यांचा सोळा मताने पराभव केला तर प्रभाग 13 मध्ये राष्ट्रवादीच्या मिनाज मोकाशी यांनी शिवसेनेच्या सुलतान हकिम यांचा 66 मतांनी पराभव केला प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला याठिकाणी सेनेच्या आसमा इनामदार यांनी राष्ट्रवादीच्या शबाना मुकादम यांचा 36 मतांनी पराभव केला.
कोणी कोणाला कोणता पिक्चर दाखवला…?
पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत सुज्ञ जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही खोट्या विकासकामांच्या आश्वासनांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पाटण नगरपंचायतीत अबाधित ठेवली आहे त्यामुळे या निवडणुकीत कोणी कोणाला कोणता पिक्चर दाखवला? हे आता जनतेने ठरवायचे आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण नगरपंचायतीत पराभव झाला आहे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने विजयाचे घोडदौड सुरू ठेवली आहे.
– सत्यजितसिंह पाटणकर (संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.)
प्रभाग 15 मध्ये शिवसेनेने बाजी मारत राष्ट्रवादीच्या वैशाली पवार यांचा 26 मताने पराभव केला याठिकाणी सेनेच्या शैलजा पाटील निवडून आल्या प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कांबळे यांनी सेनेच्या प्रणिता कांबळे यांचा 21 मताने पराभव केला तर प्रभाग 17 मध्ये विद्यमान नगरसेवक उमेश टोळे यांनी बाजी मारत चंद्रकांत चौधरी यांचा तब्बल 166 मताने पराभव केला.
पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला 15 शिवसेना 2 जागा मिळाल्या त्यामुळे पुन्हा नगरपंचायती व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित राहिली आहे जिल्हा बँकेने नंतर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.