Pune Kidnapping Case Balewadi | …अन् अपहरणकर्त्याकडून आठ दिवसांनी सुटका
पुणे – अपहरण केल्यानंतर आठ दिवसांनी चिमुरड्याला अपहरणकर्त्यांने एका कामगाराकडे सोडून दिले. त्याच्या जवळील दप्तरात ठेवलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून त्या कामगाराने त्याच्या पालकांशी संपर्क साधून या चिमुरड्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पसार झालेल्या अपहरण कर्त्याचा शोध घेण्याच्या मोहीमेस पोलिसांनी वेग दिला आहे. तब्बल एक आठवड्यापर्यंत या लहानग्याचा शोध लागत नव्हता.
हे अपहरणाचे थरारनाट्य दि. 11 ला सुरू झाले. स्वर्णम सतिश चव्हाण या चार वर्षीय मुलाला त्याचा मामा शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याची फिर्याद दाखल झाल्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याचा युध्द पातळीवर तपास सुरू केला होता. त्यासाठी सुमारे 300 कर्मचारी तपास कार्यात सहभागी झाले होते. तरीही त्याचा तपास लागत नव्हता.
स्वर्णमचे वडील डॉ. सतिश चव्हाण यांनी मुलाची सुटका करावी म्हणून समाज माध्यमांद्वार आवाहन केले होते. त्याला द्यावयाच्या औषधांचीही माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे याची शहरात चर्चा सुरू झाली. पोलिसांच्या आवाहनानुसार दैनिकांनी याचे वृत्त प्रकाशित केले नव्हते.
“या प्रकरणाचे धागेदोरे आम्हाला सापडले आहेत. माध्यमांनी आणि त्याच्या पालकांनी उत्तम सहकार्य केले आहे. लवकरच यातील 100 टक्के सत्य समोर आणू. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
-रविंद्र शिसवे,पोलीस सहआयुक्त, पुणे
अपहरणकर्त्याने बुधवारी (दि.19) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान स्वर्णमला पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ आणले. येथे बसलेल्या दादाराव जाधव यांच्याजवळ या मुलाला सोडले आणि मी दहा मिनिटात येतो म्हणून सांगितले. त्यानंतर अपहरणकर्ता निघून गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने आणि स्वर्णमही देखील रडू लागल्याने जाधव यांनी त्याची पिशवी तपासली. त्यात एक मोबाईल क्रमांक लिहलेला होता. त्यावर त्यांनी संपर्क साधला. स्वर्णमच्या वडिलांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यावेळी हा स्वर्णम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती देत मुलाला ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली.
घटना स्थळावर पोहोचताच स्वर्णमने आईकडे जोरदार धाव घेतली. मायलेकराच्या डोळ्यातून पुन्हा भेटल्यानंतर आसवे वाहू लागली. मायलेकरांची ही भेट पाहून एरवी कठोर वाटणाऱ्या पोलिसांच्याही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या.





