पुणे -पुण्यातील नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होईल. मात्र त्याची जागा आत्ता तातडीने सांगणार नाही. अशी भूमिका मांडत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ होणार असल्याचा निर्वाळा दिला. मात्र त्यामुळे विमानतळ पुरंदरला होणार की खेडला हलणार याबाबत चर्चा सुरू झाली.
पुण्यातील विधान भवन याठिकाणी आयोजीत करोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकरांशी बोलत होते. त्यावेळी पुरंदर येथील विमानतळाबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरवातीला खेड तालुक्यात प्रस्तावित होते. मात्र, विविध गटांकडून होत असलेल्या विरोधामुळे विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले.
पुरंदर तालुक्यात विमानतळ येणार असल्याच्या हालचाली सुरू होताच तेथील जागा खरेदी-विक्रीची प्रकरणे वाढली. मात्र, आता पुरंदर येथील विमानतळालाही परवानगी नाकरल्यावर विमानतळ नक्की होणार कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याबाबत पवार म्हणाले, विमानतळ हे पुणे जिल्ह्यातच होणार. मात्र, ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही.
विमानतळाचा फायदा हा पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदगर या जिल्ह्यांना होणार आहे. विमानतळावर दोन रणवे पाहिजेत, त्यानुसार तयारी सुरू असून, जास्त चर्चा नको असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विमानतळ हे पुणे जिल्ह्यात होणार यावर शिक्कामोर्तब झाला असला तरी ते कुठे होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.