नवी दिल्ली – जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनने शनिवारी येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियाच्या एनजी त्झे योंगवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता तिसऱ्या मानांकित सेनचा रविवारी अंतिम फेरीत सिंगापूरच्या विश्वविजेत्या लोह कीन युशी सामना होणार आहे. दुसरीकडे महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावर असलेल्या 20 वर्षीय लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 60व्या क्रमांकावर असलेल्या योंगवर 19-21, 21-16, 21-12 असा रोमांचक विजय मिळविला आहे. अन्य उपांत्य फेरीतून पाचव्या मानांकित कॅनडाच्या ब्रायन यांगने माघार घेतल्याने लोह कीन युशीला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला.
गतवर्षी डच ओपनच्या अंतिम फेरीत लोहकडून पराभूत झाल्यानंतर सेनला आता पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला थायलंडच्या सुपानिदा कातेथॉंगकडून 14-21 21-13 10-21 असा तीन सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.