नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यानंतरही भारतातील पेट्रोल आणि डीझेलचे दर सलग 68 दिवस जैसे थे राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुका सामान्य जनतेच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे.
मागील वर्षी शंभरी पार करत पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी नवी उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यामुळे 4 नोव्हेंबर 2021 या दिवसापासून इंधन दर काही प्रमाणात कमी झाले.
त्यापाठोपाठ काही राज्यांनी स्थानिक करांत कपात केली. त्यामुळे संबंधित राज्यांमधील दर आणखी कमी झाले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर प्रतिपिंप 83 डॉलर्सच्या घरात होते. पुढील महिनाभरात तो दर 69 डॉलर्सपर्यंत खाली आला. मागील दीड महिन्याच्या काळात तो दर पुन्हा वाढत आहे. आता तो 84 डॉलर्सच्या घरात पोहचला आहे.
तसे असले तरी भारतातील पेट्रोल आणि डीझेलचे दर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळपासून वाढलेले नाहीत. लवकरच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. विधानसभा निवडणुका विचारात घेऊन इंधन दरवाढ टाळण्याचा सल्ला केंद्र सरकारने सार्वजनिक कंपन्यांना दिला असावा, असे मानले जात आहे.