पाचगणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरला थंडी वाढली असून महाबळेश्वरचा पारा शून्यावर गेला आहे. त्यामुळे वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडायला सुरवात झाली आहे. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे इथे काश्मिरच्या हिमकण दुलईचा अनुभव पर्यटक व नागरिक घेत असल्याचे दिसू लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्री वेण्णा लेक परिसरात पर्यावरणप्रेमीनी महाबळेश्वर शहराच्या थंडीचे तापमान तपासले असता महाबळेश्वरचा पारा शून्यावर असल्याचे तापमान मापकाने दर्शवले.
समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचावर असलेल्या शहरात कमालीची थंडीचा अनुभव पाहयला मिळतो. वेण्णा लेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त जाणवत आहे. वेण्णालेकच्या परिसरात बोटीवर व झाडांच्या पानावर हिमकण पडल्याचे पहायला मिळत असून निसर्गाचा हा आविष्कार मानला जातो.