जुन्नर – छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यातील चावंड, हडसर, वडज व माणिकडोह धरण, आंबे हातवीज तसेच नाणेघाट याठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व कायदा सुव्यवस्थाचा
प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बॅरिकेट्स लावून गडाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
एकीकडे लग्न समारंभ, दुकाने यांना काही अटी, शर्तींवर शासन परवानगी देत असताना शिवभक्तांना शिवनेरी गडाचे दरवाजे करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्याने किल्ले शिवनेरी दर्शनासाठी आलेल्या अनेक शिवभक्त व पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.