पिंपरी -टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकाच्या कामगिरीनंतर प्रथमच देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे.
हॉकी इंडियाच्या 11व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 11 डिसेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी हॉकी महाराष्ट्राचे सहयोगी उपाध्यक्ष आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीष आनंद उपस्थित होते.
या स्पर्धेत हॉकी इंडियाशी संलग्न असलेल्या 30 राज्य संघटनांच्या संघाचा सहभाग असेल. स्पर्धेतील सर्व सामने नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद मैदानावर पार पडतील. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राने केले असून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस सह-आयोजक असतील. स्पर्धेचा अंतिम सामना 21 डिसेंबरला होणार आहे.
यावेळी राष्ट्रीय स्पर्धा नव्या पद्धतीने घेण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला असून, केवळ राज्य संघटनांचेच संघ स्पर्धेत सहभागी होतील. यापूर्वी संलग्न असणाऱ्या संस्थानाही राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळत होता. त्यामुळे स्पर्धा एकत्र व्हायची आणि त्यानंतर स्पर्धा दोन टप्प्यात (विभाग अ आणि विभाग ब) घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हॉकी महाराष्ट्र दहाव्यांदा राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करत आहे. या आतापर्यंतच्या आयोजनात तिसऱ्यांदा हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी पुण्यात 2013 मध्ये तिसऱ्या आणि 2015 मध्ये पाचव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.