पिंपरी -शहर परिसरात बुधवारी सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाने गेल्या सहा वर्षांतील डिसेंबरमधील पावसाचे रेकॉर्ड मोडले आहे. दरम्यान, ऐन हिवाळ्याचा हंगाम असल्याने गुलाबी थंडीऐवजी पहाटेपासून पाऊस, त्यामुळे झोंबणारी थंडी आणि दाट धुके असे मिश्र वातावरण पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक 24.0 मिमी पावसाची नोंद चिंचवडमध्ये झाली आहे.
शहरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी 13 डिसेंबर 2014 ला 53.1 मि.मी. पाऊस झाला होता. शहर परिसरात दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी सकाळपासून पडणारा सतत पाऊस आणि दाट धुके यामुळे शहराला एखाद्या हिल स्टेशनसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. चऱ्होली, मोशी, डुडळगाव, रावेत, हिंजवडी, पिंपरी, निगडी या भागांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होता.
तर जिल्ह्यातील मावळसह इतर तालुक्यांमध्येही पाऊस झाला. यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरात 2019 मध्ये डिसेंबरमध्ये 1 मिमी, तर 2020 मध्ये 5 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर बुधवारचा पाऊस सर्वाधिक
ठरला आहे.
दिवसभर सूर्यदर्शन नाही
पावसाने शहराच्या विविध भागांत पहाटेपासूनच हजेरी लावल्याने ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून शहरात सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे वातावरणातील गारठा प्रकर्षाने जाणवत होता. तर अवकाळी पावसाच्या हजेरीने समाजमाध्यमांवर दिवसभर मीम्सच पाऊस सुरु होता.
का पडतोय पाऊस ?
लक्षद्वीप आणि मालदीव व लगतच्या भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुण्यासहित राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागली.
किमान तापमानात लक्षणीय घट
शहर परिसरात बुधवारी सकाळपासून पावसाचे दाट ढग जमा झाले होते. यावेळी वेगाने वारे वाहत होते. वातावरणात झालेल्या या बदलाचा परिणाम तापमानावर दिसून आला, त्यामुळेच किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही लक्षणीय घट झाल्याचे विभागाच्या नोंदीतून दिसून आले. शहरात बुधवारी हवामान पाच ते सहा अंशानी घसरून 19 अंशावर पोहचले आहे.