पिंपरी -आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध नागरिकाला दोन चोरट्यांनी धक्का देऊन खाली पाडले आणि गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपयांची सोनसाखळी पळवली. तसेच एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची बोरमाळ चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला.
दत्तात्रय सिताराम खोकराळे (वय 61, रा. खामुंडी सोमनाथ नगर, ता. जुन्नर) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दत्तात्रय देवदर्शनापूर्वी इंद्रायणी नदीच्या घाटावर हात पाय धुण्यासाठी जात होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून चोरून नेली.
मुखदर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या घाटाकडे पायी चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची सोन्याची बोरमाळ त्याच दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने ओढून चोरून नेली.