मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ नामक अति घातक अशा विषाणूने पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे देशात देखील त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र असे असतानाच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला करोनाचा लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे.
‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने या प्रवाशाला या नवीन प्रकारच्या घातक करोनाची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
या व्यक्तीला झालेल्या करोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या “ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी स्पष्ट केले आहे.
डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.