नवी दिल्ली – भारताची गुणवान महिला कुस्तीपटू निशा दहिया हिने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
काही दिवसांपूर्वी हरियाणातील सोनीपत येथील अकादमीत सराव करताना निशावर गोळीबार झाला व त्यात तिचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. या वृत्तामुळे प्रचंड तणावात असलेल्या निशाने खुद्द एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपण एकदम ठणठणीत असल्याचे सांगत हे वृत्त केवळ अफवा असल्याचेही स्पष्ट केले होते.
निशा रेल्वेकडून खेळत असून तिने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाबच्या जसप्रीत कौरला अवघ्या 30 सेंकदात आस्मान दाखवले व सुवर्ण यश प्राप्त केले. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे निशाचे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. या पदकामुळे माजी मानसिकता सकारात्मक झाली असून माझ्या मृत्यूच्या वृत्तामुळे खूप मानसिक त्रास झाला होता.
ते वृत्त पसरल्यामुळे मी प्रचंड तणावात होते. मात्र, तरीही या स्पर्धेत सहभागी व्हायचे व यश मिळवायचे हेच माझे उद्दिष्ट होते व त्यात मी यशस्वी ठरले याचा सर्वाधिक आनंद आहे, अशा शब्दात निशाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निशाने गेल्याच महिन्यात बेलग्रेड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते. 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात तिने हे यश मिळवले होते व त्यानंतर गेल्या आठवड्यातच ती मायदेशी परतली होती.