दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आजच्या लढतीत डेव्हिड वाॅर्नरच्या फलंदाजीनंतर मॅथ्यू वेद आणि मार्कस स्टोनिस यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विजयासाठी 177 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 5 बाद 177 धावा करत पूर्ण केले. आता येत्या रविवारी (14 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड याच्यांत विजेतेपदासाठी लढत होईल.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने 49(30), मिशेल माॅर्शने 28(22) धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेदने 17 चेंडूत नाबाद 41 आणि मार्कस स्टोनिसने 30 चेंडूत 40 धावा करत ऑस्ट्रेलिया विजय साकारला. पाकिस्तानकडून शादाब खानने 4 षटकांत 26 धावा देत 4 गडी बाद केले तर शाहिन आफ्रिदीने 4 षटकांत 35 धावा देत 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना पाकिस्तानच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच त्यांच्या सगळ्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले.
पाकचे ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे आव्हान
आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना 20 षटकांत 4 बाद 176 असा धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर महंमद रिझवान व फखर झमान यांनी दमदार अर्धशतके फटकावली तर कर्णधार बाबर आझमने उपयुक्त खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला.
पाकिस्तानकडून महंमद रिझवानने 67(52), बाबर आझमने 39(34) तर फखर झमान याने नाबाद 52(32) धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 2 गडी बाद केले. ऍडम झम्पा व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.