मुंबई – जागतिक पातळीवर महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांकडून विक्री चालू असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 433 अंकांनी कमी होऊन 59,919 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्ससंदर्भातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. 50 मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.80 टक्क्यांनी म्हणजे 143 अंकांनी कमी होऊन 17,873 अंकांवर बंद झाला.
बऱ्याच दिवसानंतर सेन्सेक्स 60,000 अंकाच्या खाली आणि निफ्टी 18,000 अंकाच्या खाली आला आहे. आजच्या व्यवहाराबाबत जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेत महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेसह इतर शेअर बाजारामध्ये विक्री वाढली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला.
अमेरिकेतील महागाईचा दर 6.2 टक्के इतका नोंदला गेला असून हा 30 वर्षाचा उच्चांक आहे. त्यामुळे अमेरिका लवकरच व्याजदरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, टेक महिंद्रा, सन फार्मा, एशियन पेंट्स, पावर ग्रीड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
केवळ टायटन, महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस कंपनीच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. रिऍल्टी, आरोग्य बॅंकिंग, वित्त, दूरसंचार आणि वाहन क्षेत्राला विक्रीचा मारा सहन करावा लागला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.74 टक्क्यापर्यंत कमी झाले.