दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना आपल्या डावात 4 बाद 176 असा धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर महंमद रिझवान व फखर झमान यांनी दमदार अर्धशतके फटकावली तर कर्णधार बाबर आझमने उपयुक्त खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला.
या सामन्यातील विजयासह अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने मोठी मजल मारली असून आता ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या भरात असलेल्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना पाकिस्तानच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच त्यांच्या सगळ्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. सलामीवीर कर्णधार आझमने रिझवानच्या साथीत संघाला 71 धावांची सलामी दिली. भरात असलेला आझम लेग स्पीन गोलंदाज ऍडम झम्पाच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 39 धावांची खेळी करताना 34 चेंडूत पाच चौकार फटकावले. त्यानंतर आलेल्या झमानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यानेही दमदार अर्धशतकी खेळी केली व रिझवानच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी करत संघाला दीडशतकी धावांच्या जवळ पोहोचवले.
त्याचवेळी अर्धशतकी खेळी करणारा रिझवान 67 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 52 चंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार फटकावले. तो बाद झाल्यानंतर माजी कर्णधार शोएब मलिकने निराशा केली. या स्पर्धेत भरात असलेला आसीफ अलीही अपयशी ठरला. दरम्यान झमानने अखेरच्या षटकांत घणाघाती फलंदाजी केली. त्याने नाबाद 55 धावा करताना 32 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
पाकिस्तानच्या धावसंख्येला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 13 अवांतर धावा देत हातभार लावला. पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 2 गडी बाद केले. ऍडम झम्पा व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान – 20 षटकांत 4 बाद 176 धावा. (महंमद रिझवान 67, बाबर आझम 39, फखर झमान नाबाद 55, महंमद हाफीद नाबाद 1, मिशेल स्टार्क 2-38, ऍडम झम्पा 1-22, पॅट कमिन्स 1-30).