व्हॅटिकन सिटी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि विविध विषयावर व्यापक चर्चा केली. पंतप्रधानांनी पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले आहे.
पोप फ्रान्सिस हे 2013 मध्ये पोप म्हणून निवडले गेल्यानंतर त्यांची भेट घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. व्हॅटिकन सिटीमधील ऍपोस्टोलिक पॅलेसमध्ये मोदी यांनी पोप यांची भेट घेतली. यावेळी पोप यांच्याशी व्यापक विषयांवर चर्चा झाली, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यातील भेट केवळ 20 मिनिटांची ठरली होती. मात्र ही भेट तासभर चालली. वातावरण बदलासाठीच्या उपाय योजना आणि दारिद्रय निर्मूलनासारख्या विषयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी कॅथोलिक चर्च आणि भारताच्या संबंधांबाबतही चर्चा झाली. यावेळी जागतिक परिपेक्ष्यातून कोविड-19, आरोग्य समस्या, शांतता आणि सौहार्द अबाधित राखणे आणि अशाच सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.
यावेळी मोदी यांच्या समवेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील उपस्थित होते.
मोदी यांनी पोप यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले आहे. यापूर्वी 1999 साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालिन पोप जॉन पॉल द्वितीय हे भारतभेटीवर आले होते. आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पोप यांना भारत भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे.